सोक्षमोक्ष: मतदारराजाला प्रतीक्षा “थेट जनसंवादा’ची!

जयेश राणे

निवडणुकीच्या धामधुमीत मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी जाहीरसभा, रोडशो, सोशल मीडिया आदींचा उपयोग होत असतो. या माध्यमातून जनतेशी संवाद साधायचा असे त्यामागील प्रयोजन असते. निवडणूक प्रचाराची ही पारंपरिक पद्धत आहे. त्यात वर्ष 2014 च्या लोकसभा निवडणुकांपासून सोशल मीडियाचा उपयोग करून प्रसार करण्याच्या प्रकाराची भर पडली आहे. निवडणुका येतात, सभा होतात, मतदान होते, निकाल लागतो, सरकार स्थापन होते, असे चक्र सुरूच असते. या सर्वांमध्ये जनतेशी ‘थेट संवाद’ किती प्रमाणात होतो? हे महत्त्वाचे असते.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा घटनादत्त अधिकार आहे. राजकीय क्षेत्रात याविषयी पाहता, असे करताना मुद्द्यांवर बोलणारे कोण?, मुद्दे आणि गुद्दे यांचा उपयोग करणारे कोण?, वाचाळपणा करणारे कोण? आदी वर्गवारी लक्षात घेता आपण कोणत्या पंगतीत बसतो याची प्रत्येकाला कल्पना आहे. यामध्ये कोण कसा आहे? याची जनतेलाच उत्तम जाण आहे. कारण जनताच या सर्वांची उत्तम निरीक्षक आहे. मी कसा आहे, हे मी सांगण्यापेक्षा ते जनतेच्या मुखातून येण्याला महत्त्व आहे. माजी लोकप्रतिनिधी, विद्यमान लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी होण्याची इच्छा म्हणजेच भावी लोकप्रतिनिधी, असा लोकप्रतिनिधी वर्गाचा असलेला प्रवास लक्षात घेता यांना जनतेचे ऐकण्याची संधी अधिक प्रमाणात असते. यांनी स्वतःला काय वाटत? त्यापेक्षा जनतेला काय वाटत? तसे करणे, बोलणे अगत्याचे आहे. यासाठी “थेट जनसंवाद’ महत्त्वाचा ठरतो. त्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे.

राजा म्हटल्यावर राजा आणि रयत असा विचार येतो. रयतेच्या मनात काय सुरू आहे? त्यांना कोणत्या समस्या आहेत? ते कसे जीवन व्यतीत करत आहेत? ते खरोखरच सुखी-समाधानी आहेत का? या सर्व प्रश्‍नांची अचूक उत्तरे मिळवण्यासाठी राजाला रयतेत मिसळणे अनिवार्य असते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आदी राजे वेषांतर करून रयतेत मिसळत आणि वरील प्रश्‍नांची उत्तरे स्वतः जाणून घेत. अशा थोर महापुरुषांना देण्यात आलेली “जाणता राजा’ ही उपाधी किती योग्य आहे, याचा अंशतः उलगडा तरी येथे होतो. आता कोणी म्हणेल त्या वेळची स्थिती वेगळी होती आणि आताची स्थिती वेगळी आहे. काळ बदलला आहे. त्याप्रमाणे संपर्क व्यवस्थाही बदलली आहे. हे सर्व सांगण्याचे कारण हेच आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांकडे चाणाक्ष असे गुप्तहेर खाते होते. तरीही ते वेळप्रसंगी स्वतः वेषांतर करून रयतेत मिसळत असत. कारण एखाद्या गोष्टीची केवळ माहिती घेणे आणि ती घेण्यासह रयत प्रत्यक्षपणे त्या स्थितीला कशाप्रकारे तोंड देत आहे, हे स्वतः जाऊन अभ्यासणे या अनुभवात पुष्कळ अंतर आहे. हे अंतर कमी कसे करायचे याचा अभ्यास झाला पाहिजे.

सध्याचे वातावरण निवडणूकमय झाले आहे. प्रतिदिन जुनीच पण निवडणुकीच्या कालावधीतील नवीन सूत्रांचा “स्ट्राइक’ (मारा) सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप यांच्या फैरी नव्हे तर गगनभेदी उखळी तोफांचा मारा सुरू आहे. प्रश्‍न असा आहे की, सभांतून सांगण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी जनतेला माहीत आहे, असे असताना सत्ताधारी आणि विरोधक प्रतिदिन नवीन राजकीय विषय चर्चेत आणून नेमके काय साध्य करू इच्छित आहेत? जनता पोट भरण्यासाठी नेहमीप्रमाणे नोकरी-व्यवसाय यांत मग्न आहे. तर कोणी कष्टाची मोलमजुरी करून पोटाची खळगी भरण्यासाठी राबराब राबण्यात व्यस्त आहे. म्हणजे जनतेपैकी सर्वचजण आपल्या उपजीविकेच्या क्षेत्रात व्यस्त आहेत. असे असताना आरोप-प्रत्यारोप यांचे “राजकीय स्ट्राइक’ करून कोणते परिवर्तन होणार आहे? निवडणुका म्हटल्या की, या गोष्टींना अधिक जोर येतो. वर्षांनुवर्षे भारतीय लोकशाही हेच पाहात आली आहे. यात कोणतेही परिवर्तन झालेले नाही. ते होण्यासाठी जनतेनेच पुढाकार घ्यावा.

मे महिन्याप्रमाणे उन्हाळा सुरू झाला आहे. घामाच्या धारा निघत आहेत. अंग मेहनत करून घाम गाळणाऱ्यांना या धारांची सवय असल्याने त्यांना कदाचित या स्थितीतही वेगळे असे काही वाटत नसावे. पण शेवटी हा मनुष्य देह असल्याने त्याला वातावरणाच्या बदलाचा कमी-अधिक प्रमाणावर त्रास हा होत असतो. लक्षवेधी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांचा कालावधी हा ऐन गर्मीच्या महिन्यात आहे. त्यामुळे राजकीय पटलावरही प्रचार-प्रसार करताना घाम गाळावा लागत आहे. काहीजण म्हणतील आम्हाला याची सवय आहे. आम्ही निवडणुका आल्यावरच मैदानात उतरत नाही. हे तर चांगलंच आहे म्हणा! किंबहुना ते कर्तव्यच आहे. लोकसेवा करायची म्हणून मैदानात उतरल्यावर घाम गाळणे हे आलेच. नागरिकांचा किती घाम गळत असतो हे त्यांनाच ठाऊक आहे!

या कालावधीत काही वृत्तवाहिन्या जनता (मतदारराजा), विद्यमान लोकप्रतिनिधी आणि विरोधी नेते असा चर्चासत्रात्मक कार्यक्रम आयोजित करतात. नागरिकांतूनही त्याला भरघोस असा प्रतिसाद मिळतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या जनसंख्येवरून हे सूत्र लक्षात येते. या वेळी विद्यमान लोकप्रतिनिधीने केलेली व प्रलंबित असलेली कामे सांगण्यात येतात. याविषयी जनता, विरोधी नेते यांच्याकडूनही प्रश्‍न विचारले जातात. या माध्यमातून थेट जनसंवाद होत असतो.

राजकीय पक्ष सभांच्या माध्यमांतून एकमेकांवर ताशेरे ओढत असतात. सभांवर सभा घेतल्या जातात. त्यांतून विविध नेत्यांची भाषणे होतात. जनता ते केवळ ऐकण्याचे काम करते. तिला बोलण्याची संधीच मिळत नाही. ती संधी कशी मिळेल? यासाठी अधिक चांगल्याप्रकारे नियोजन करून जनसंवाद कसा होईल याकडे लक्ष दिले जाईल का? सभा, रोड शो म्हणजे जनसंवाद नाही. एकतर्फी नाही तर दोन्ही बाजूंनी संवाद असणे अत्यावश्‍यक असते, तरच त्याला संवाद असे म्हणता येईल. त्यामुळे जनता आणि लोकप्रतिनिधी अशी नाळ जोडली जाण्यास खऱ्या अर्थाने साहाय्य होईल. केले तर बरच काही शक्‍य आहे अन्यथा सर्वच अशक्‍य आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.