पुणे – लॉकडाऊनमुळे दोन महिने ठप्प असलेल्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) सज्ज झाले आहे. विभागातर्फे विविध पर्यटनस्थळ तसेच विभागाच्या सर्व रिसॉर्टचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. भविष्यात पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी आतापासून एमटीडीसीने काही खबरदारीची पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
लॉकडाऊन नियमांत आणखी शिथिलता दिल्यानंतर पर्यटनही सुरू होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर एमटीडीसीचा “रोड मॅप’ तयार असून, रिसॉर्टमधील खोल्यांची दुरुस्ती, निर्जंतुकीकरण, पर्यटकांचे शारीरिक तापमान मोजण्याची व्यवस्था, प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण स्प्रेची व्यवस्था तसेच पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी दिली.