उद्घाटनानंतर 15 दिवसांत एकही व्यापारी फिरकला नाही
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी येथील इंदिरा गांधी पुलाजवळ लाखो रुपये खर्च करुन उभा करण्यात आलेले फूल मार्केटला अद्याप सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. उद्घाटन होऊन 15 दिवस झाले तरी या नव्या फूल मार्केटमध्ये एकही व्यापारी आलेला नसल्याने उभारणीनंतर हे मार्केट ओस पडले आहे. अत्यावश्यक सुविधा नसल्याने व्यापारी येथे व्यवसाय करत नसल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात विविध प्रकारच्या फुलांची आवक दररोज मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे, पिंपरीमध्ये शगुन चौक ते पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरात दरररोज फुलांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. मात्र, मागील काही वर्षांमध्ये या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्यामुळे ही जागा अपुरी पडत होती. परिणामी, अपुऱ्या जागेमुळे व्यापारी, शेतकरी व ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे, पिंपरी-चिंचवड शहरातील फुलवाले, आडते असोसिएशन व बाजार समितीने स्वतंत्र फुलमार्केटची मागणी केली होती. त्यानुसार, पालिकेने इंदिरा गांधी पुलाच्या खाली मोकळ्या जागेमध्ये लाखो रुपये खर्च करुन 27 गाळे उभे करुन स्वतंत्र फूलमार्केट उभे केले. या मार्केटचे मागील 15 दिवसांपूर्वी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले.
मात्र, उभारण्यात आलेल्या मार्केटमध्ये वीज, पाणी आणि स्वच्छतागृहाचीही व्यवस्था नाही. गाळ्यांची अनेक कामे बाकी आहेत. त्यामुळे, सध्या तरी या ठिकाणी फूल मार्केट सुरु होण्यास वेळ लागणार असल्याचे दिसत आहे.