428 कोटींच्या कामांना आदेशाची प्रतीक्षा

दीपेश सुराणा
निवडणुका संपल्यानंतर आता कामांना वेग ः पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे आव्हान

विधानसभा आचारसंहितेची धास्ती
लोकसभा निवडणुक आचारसंहिता संपल्यानंतर महापालिका स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत धोरणात्मक निर्णय घेणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे विकास कामांना वेग येऊ शकेल. पुढील दोन महिन्यांतच विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू होण्याची धास्ती आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियांना आणि परिणामी विकासकामांना खिळ बसू शकते. त्यामुळे लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर विकासकामांना तातडीने वेग कसा देता येईल, त्या दृष्टीने नगरसेवकांचा पाठपुरावा असणार आहे.

पिंपरी  -महापालिका स्थापत्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या 1375 कोटी 65 लाख रुपयांच्या 950 निविदांपैकी लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी 847 निविदांसाठी कार्यादेश दिलेले आहेत. 946 कोटी 95 लाख रुपये रकमेच्या विकासकामांचा त्यामध्ये समावेश आहे. 103 कामांच्या निविदांबाबत अद्याप आदेश देणे प्रलंबित आहे. 428 कोटी 70 लाख रुपये रकमेची ही कामे आहेत. संबंधित कामांना आता लोकसभा निवडणुका संपल्यानंतर वेग मिळणार आहे. तसेच, रस्ते, पावसाळी गटार आदींची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे.

शहरामध्ये लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 1375 कोटी 65 लाख रुपये रकमेच्या 950 निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यातील 946 कोटी 95 लाख रुपये रकमेच्या 847 निविदांना कार्यादेश देण्यात आले. सध्या प्रामुख्याने डांबरी व क्रॉंक्रिट रस्त्यांची कामे सुरू आहेत. अद्याप 103 कामांच्या निविदांना प्रत्यक्ष कार्यादेश दिलेले नाही. लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी (दि. 23) लागला. त्यामुळे लवकरच आचारसंहिता पूर्णत: शिथिल होईल. त्यानंतर संबंधित विकासकामांना कार्यादेश देणे शक्‍य होणार आहे. त्याशिवाय, नव्याने देखील स्थापत्य विभागातर्फे काही निविदा प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे.

निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिका स्थापत्य विभागाने 25 लाखाच्या आतील 600 कामांसाठी 109 कोटी 80 लाख रुपये रकमेच्या निविदा प्रसिद्ध केल्या. तर, 25 लाखाच्या वरील कामांसाठी 1272 कोटी 91 लाख रुपये रकमेच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. डांबरी, कॉंक्रिटचे रस्ते, इमारतींची कामे, पावसाळी गटारांची कामे, पेव्हींग ब्लॉक आदी कामांचा त्यामध्ये समावेश होता. त्यातील 946 कोटी 95 लाख रुपयांच्या कामांसाठी आचारसंहितेपूर्वीच कार्यादेश दिलेले असल्याने ती कामे सुरू होती. मात्र, 428 कोटी 70 लाख रुपयांच्या कामांबाबत कार्यादेश देणे प्रलंबित आहे.

आचारसंहिता असल्याने नवीन विकासकामे पूर्णत: ठप्प पडली आहेत. नवीन निविदा उघडणे, कार्यादेश देणे आदींना प्रतिबंध आहे. आचारसंहिता पूर्णत: शिथिल झाल्यानंतर महापालिकेला ही कामे करता येणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर महापालिका प्रशासनाला प्रामुख्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ते आणि पावसाळी गटारांची कामे करावी लागतील. पावसाळ्यात ही कामे करता येणार नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.