छावण्यांना अनुदानाची प्रतीक्षा

नगर – जिल्ह्यात आतापर्यंत 350 चारा छावण्या सुरू झाल्या असून त्यांच्या त्रुटींवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. परंतू त्या छावण्यांना अनुदान कधी मिळणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महिना लोटला तरी या छावणी चालकांना अनुदान न मिळाल्याने आता त्यांना छावण्या चालविणे देखील अवघड झाले आहे. सध्या 350 छावण्यांमध्ये 2 लाख 13 हजार 569 जनावरे दाखल झाले असून त्यांच्यावर दररोज दोन कोटी रुपये खर्च होत आहे.

शासनाकडून अनुदाना उपलब्ध न झाल्याने जिल्हा प्रशासन देखील काही करून शकत नाही. तातडीने या छावणी चालकांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासकीय अधिकारी या निवडणुक कामात गुंतले आहे. तर छावणी चालक देखील काही प्रमाणात निवडणूक प्रचारात आहे. जे छावणी संभाळतात त्यांना मात्र चारा, पाण्याची व्यवस्था कशी करायची याची चिंता असते. चारा छावणीत आठवड्यातून तीन दिवस मोठ्या जनावरांना एक किलो व लहान जनावरांना अर्धा किलो पशुखाद्य देण्याचा नियम आहे. याशिवाय हिरवा चारा असल्यास मोठ्या जनावरांना दररोज पंधरा किलो व लहान जनावरांना साडेसात किलो देण्यात यावा.

हिरव्या चाऱ्याऐवजी प्रक्रियायुक्त वाळलेला चारा असल्यास तो मोठ्या जनावरांना दररोज सहा किलो व लहान जनावरांना तीन किलो देण्यात यावा, किंवा मुरघास असल्यास तो मोठ्या जनावरांना दररोज आठ किलो व लहान जनावरांना चार किलो देण्यात यावा, असे निर्देश चारा छावणीचालकांना देण्यात आले आहेत. मोठ्या जनावरासाठी प्रतिदिन 70 रुपये व लहान जनावरासाठी प्रतिदिन 35 रुपये अनुदान दिले जात होते. मात्र, या अनुदानात एक एप्रिलपासून वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता एका मोठ्या जनावरासाठी प्रतिदिन 90 रुपये व लहान जनावरासाठी 45 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. परंतू अद्यापही या छावणी चालकांना अनुदान मिळाले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.