आयोजकांकडून तयारी सुरू; मात्र आगामी काळातील परिस्थिती लक्षात घेत नियोजन
पुणे – सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात दरवर्षी चित्रपट महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. यंदा यावरदेखील करोनाचे सावट आहे. मात्र, आयोजकांनी महोत्सवांची तयारी सुरू केली आहे. आगामी काळातील परिस्थिती लक्षात घेवून आयोजन करावे लागणार असल्याने “वेट ऍन्ड वॉच’ भूमिका घेणे उचित असल्याचे मत व्यक्त केले.
पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना वेगळेच वलय आहे. स्थानिक लघुपट, माहितीपट महोत्सवापासून ते जागतिक चित्रपट महोत्सवांचे आयोजन थाटात करण्यात येते. यासाठी पुण्याव्यतिरिक्त लाखो प्रेक्षक शहरात येत असतात. चित्रपटप्रेमी, रसिक आणि अभ्यासकांसाठी चित्रपट महोत्सव पर्वणी असते.
मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट गृह सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने यंदा आयोजकांपुढे अनेक प्रश्न पडले आहेत. त्यामुळे महोत्सवाच्या स्वरुपाबाबत निर्णय त्यावेळच्या परिस्थितीनुसार घ्यायचा असून, आता “ट्रायल ऍन्ड एरर’च्या बरोबरीने “वेट ऍन्ड वॉच’ची भूमिका आयोजकांनी घेतली आहे.
चित्रपटगृह सुरू होईपर्यंत महोत्सव घेणे अवघड आहे. सद्य:स्थितीनुसार ऑनलाइन चित्रपट महोत्सव घेणे शक्य आहे. परंतु, त्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा “रिच’ जास्त असतो. यामुळे जगभरातील प्रेक्षक जोडले जातात. पण प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद, आर्थिक गणिते आदी अनेक ऑनलाइन महोत्सवांमुळे आहेत.
आर्थिक गणित जुळवणे अवघड
लहान चित्रपट महोत्सवांच्या आयोजनाचा खर्च देखील 25 लाखांच्या घरात असतो. त्यात आगामी काळात चित्रपटगृहांचा खर्च, त्यांचे निर्जंतुकीकरण, कलाकारांचे मानधन, तिकीट खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न आदी बाबींचा व्यावहारिक मेळ घालणे मनोरंजन क्षेत्रासाठी मोठे आव्हान आहे. याशिवाय, महोत्सवांसाठी विविध प्रायोजक असतात. मात्र यंदा प्रायोजकांचे प्राधान्य, त्यांची आर्थिक स्थिती पाहणे गरजेचे आहे. “ओटीटी’ प्लॅटफॉर्मची नियमावली वेगळी असल्याने त्याचे नियोजन करणेदेखील गरजेचे आहे.
महोत्सवांची तयारी जून महिन्यापासून सुरू
महोत्सवांची तयारी साधारण जून महिन्यापासून सुरू होते. महोत्सवासाठी देशविदेशातून चित्रपटाच्या “एन्ट्री’ज आयोजकांकडे येत असून, याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर पुढचे परीक्षण आणि त्याच्या “स्क्रिनिंग’चे नियोजन निश्चित करण्यात येते. चित्रपटांचे काम बाकी असणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडूनदेखील चित्रपट पाठवण्याबाबत सांगण्यात येत आहे.
मनोरंजन क्षेत्राची घडी बसायला बराच कालावधी लागू शकतो. ऑनलाइन कार्यक्रमांना “रिच’ जास्त आहे. परंतु, त्याचे आर्थिक गणित जुळवणेदेखील आव्हानात्मक आहे. मागील काही वर्षे मंदीचा फटका बसला होता. मात्र करोनामुळे झालेले नुकसान अधिक आहे. सांस्कृतिक क्षेत्रातदेखील करोनाची दहशत आहे. दरवर्षी महोत्सवात नवीन चित्रपट दाखवण्यात येतात. मात्र यंदा ऑनलाइन महोत्सवांमध्ये चित्रपट प्रदर्शनाबाबत दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये संभ्रम आहे. यंदाच्या महोत्सवांना बऱ्याच मर्यादा आहेत. त्यामुळे आगामी काळातील परिस्थिती लक्षात घेवूनच महोत्सवाचे नियोजन करावे लागणार आहे.
– विरेंद्र चित्राव, आशय सांस्कृतिक