नवी दिल्ली : देशातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या देशासाठी चिंता वाढवणारी बाब नसली तरी नव्या स्ट्रेन जगाला धडकी भरवली आहे. त्यातच करोना प्रतिबंधक लशींच्या आपत्कालीन परवान्यासाठी सीरम इन्स्टिटय़ूटबरोबरच ‘भारत बायोटेक’ने केलेले अर्ज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने पुन्हा प्रलंबित ठेवले. या अर्जाबाबत समितीची उद्या म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला पुन्हा बैठक होणार आहे.
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या करोनावरील लशीला ब्रिटनने बुधवारी मान्यता देताच हीच लस ‘कोव्हिशिल्ड’ या नावाने उत्पादित करणाऱ्या ‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी भारताच्या नियामकांकडून परवानगीबाबत आशावाद व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिटय़ूटबरोबरच फायझर, भारत बायोटेक या कंपन्यांच्या अर्जाबाबत तज्ज्ञ समितीची बैठक सुरू झाल्याने त्याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. मात्र, फायझरने तपशिलासाठी आणखी मुदत मागितली, तर ‘सीरम’ आणि ‘भारत बायोटेक’ने पुन्हा सादर केलेला तपशील आणि आकडेवारीचे समितीने विश्लेषण केले, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नसून, १ जानेवारीला समितीची पुन्हा बैठक होणार आहे, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले. करोनावरील लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची मागणी करणारे अर्ज फायझर कंपनीपाठोपाठ सीरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक यांनी केले होते. भारत बायोटेक ‘कोव्हॅक्सीन’ नावाची लसनिर्मिती करत आहे.
याआधी ९ डिसेंबरला समितीने अपुऱ्या तपशिलामुळे या कंपन्यांच्या अर्जावर निर्णय घेतला नव्हता. ‘सीरम’ला संपूर्ण तपशील सादर करण्याची सूचना समितीने केली होती. तसेच ‘भारत बायोटेक’ला समितीने तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा तपशील सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर बुधवारच्या बैठकीतही लशींच्या परवानगीबाबत निर्णय न झाल्याने भारतीयांना लशींसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता १ जानेवारीला होणाऱ्या समितीच्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.