लाहोर – आयसीसीने करोनाचा धोका असताना तयार केलेल्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पाकिस्तानचा क्रिकेटपटू वहाब रियाझ दोषी आढळला आहे. चेंडूला लाळ लावल्याने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.
पाकिस्तान आपल्याच भूमीवर झिम्बाब्वे विरुद्धची टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाझने आयसीसीच्या नियमाचा भंग केल्याचे उघड झाले. ही घटना झिम्बाब्वेची फलंदाजी सुरू असताना 11 व्या षटकांत घडली.
त्यावेळी झिम्बाब्वेची अवस्था 3 बाद 77 अशी बनली होती. त्यावेळी रियाझने गोलंदाजी करताना चेंडूच्या एका बाजूची चकाकी कायम राहावी यासाठी त्याला लाळ लावली. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने गेल्या मार्चपासून आयसीसीने चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ लावू नये, असा नियम केला होता. याच नियमाचे रियाझने उल्लंघन केले आहे.
पंचांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यावर त्यांनी रियाझसह संपूर्ण पाकिस्तान संघाला ताकीद दिली व तो चेंडू सॅनिटायझर तसेच अन्य एका रसायनाने साफ केला. मात्र, ही गोष्ट केवळ ताकीद देऊन संपुष्टात येणार नसून रियाझवर नियमभंगाची कारवाई देखील होणार आहे.