वाघोली (प्रतिनिधी) :- पुणे – अहमदनगर रस्त्यावरील फुलगाव फाटा येथील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ग्रामस्थांनी पुढाकार घेत येथील वाहतूक कोंडी दूर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी नागरिकांचे आभार मानले.
पुणे-अहमदनगर वाहतुक नियंत्रण समितीचे मुख्य कार्यवाह संपत गाडे यांनी सांगितले की, नगर रस्त्यावर फुलगाव फाटा येथे 2 ते 3 तास वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. फुलगाव फाटा येथे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली. पोलीस व ग्रामस्थांच्या वतीने ही कोंडी दूर करण्यात वाहतूक नियंत्रण समितीच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.
पुणे-अहमदनगर रस्त्यावरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले तर वाहतूक कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही. सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत देखील मोठ्या प्रमाणात वाघोलीत वाहतूककोंडी होत असून याकामी जास्तीचे पोलीस उपलब्ध करून देण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे करणार आहे.
– संपत गाडे, मुख्य कार्यवाह (वाहतूक नियंत्रण समिती)
माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना देखील या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पुणे-अहमदनगर रस्त्यावर सध्या रस्त्याचे काम चालू असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून याकामी योग्य ती खबरदारी वाहतूक पोलीस यंत्रणेकडून दखल घेण्याची गरज असल्याचे गाडे यांनी सांगितले.