लॉकडाऊनमुळे रखडले होते रुंदीकरणाचे काम
वाघोली (प्रतिनिधी) : लॉकडाऊनमुळे वाघोली येथे महामार्गावर वाघेश्वर चौक ते श्रेयस गार्डन पर्यंत पीएमआरडीए करीत असलेल्या तेराशे मीटरच्या रखडलेल्या कामाने गती पकडली असून रस्ता डांबरीकरण, डिव्हायडर रंगरंगोटी, रस्ता रुंदीकरणाची कामे ठेकेदाराकडून केली जात आहे.
वाघोली येथे महामार्गावर होणाऱ्या तेराशे मीटर रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत आमदार अशोक पवार यांनी अनेकदा प्रत्यक्ष पाहणी करून पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला कामात गतिमानता आणण्याच्या सूचना केल्या होत्या. लॉकडाऊन झाल्यामुळे तेराशे मीटरचे काम पूर्णपणे बंद झाले होते. काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने महामार्गावरील काम करण्यास सुरुवात केली असून सध्या रुंदीकरणाच्या कामाने गती पकडली असल्याचे राष्ट्रवादीचे युवा नेते चिराग सातव पाटील यांनी सांगितले.