वाघोली – महाराष्ट्र राज्यामध्ये लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे अनेक लोककला लोप पावल्या असून लोक कलाकारांना हाताला काम नसल्याने त्यांचे जिने जिकीरीचे झाले आहे. अशा लोककलावंतांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी केले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोककलावंतांना अन्नधान्य वाटप करण्यात आले या प्रसंगी दाभाडे बोलत होते.
महाराष्ट्र राज्यातील लोक कलावंतांच्या प्रश्नांच्या बाबत अग्रभागी भूमिका मांडून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या सुरेखाताई पुणेकर या उपेक्षित व गोरगरीब, गरजू कलावंतांसाठी मदतीचा हात पुढे करत असून या मदतीच्या हाताला शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारले. शिरूर व हवेली तालुक्यातील अनेक उपेक्षित गोरगरीब कलावंतांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढाकार घेत आहेत.
वाघोली तालुका हवेली येथील शिरूर-हवेली चे लोकप्रिय आमदार अशोक पवार मित्रपरिवार व हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील ( गवळी) मित्रपरिवार यांच्या पुढाकाराने शिरूर व हवेलीतील कलावंतांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येत असून या कार्याचा शुभारंभ वाघोली येथे करण्यात आला.
याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब विर, सागर गायकवाड, अजिंक्य सातव, ओमकार सातव, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल चे युवा नेते करण संदीप थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब सातव पाटील मित्रपरिवाराने ज्याप्रमाणे लोक कलावंतांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे अशाच प्रकारचा मदतीचा हात समाजातील इतर घटकांनी देखील करावा असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी केले आहे.