वाघोली -येथील देवदूत करोनावर मात करीत घरी परतल्यानंतर नागरिकांनी टाळ्या वाजवून आणि फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत केले. या देवदूताचे नाव आहे डॉ. स्वाती आंबेकर.
वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे यांच्या भगिनी डॉ. स्वाती आंबेकर या रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून मांजरी येथील क्लिनिक त्यांनी करोनाच्या काळात सुरू ठेवले होते. मात्र, याच कालावधीत त्यांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. डॉक्टरच करोनाच्या कचाट्यात सापडल्याने सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक जण भयभीत झाले होते.
मात्र, डॉक्टरांच्या परिश्रमामुळे आपली करोनापासून सुटका होते. त्यामुळे घाबरून जावू नका, करोनाला धिराने लढा द्या व शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करा, असे डॉ. आंबेकर यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी केलेले स्वागत पाहून डॉ. आंबेकर भावूक झाल्या होत्या. तर सोशल मीडियावर डॉ. आंबेकर यांची भावनिक पोस्ट खूप चर्चेला आली आहे.