Wagholi Murder Case – वाघोली येथील बायफ रोडवरील आर.पी.एस. हेरिटेज सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये तरुणाचा त्याच्याच मित्रांनी गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २४) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा देखील सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.विकी विजय दिवटे (वय २१, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई नंदा दिवटे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी दिवटे व त्याचे अन्य पाच मित्र शनिवारी रात्री वाघोलीतील आर.पी.एस. हेरिटेज सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रतिक मोरे याच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आले होते. तेथे काही कारणावरून दिवटे व त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसक झटापटीत होऊन दिवटे याच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला. अत्यंत क्रूरपणे गळा चिरल्यामुळे दिवटे याचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर आरोपी फ्लॅटमधून पळून जाऊन सोसायटीच्या गेटबाहेर पसार झाले. विशेष म्हणजे या सोसायटीसमोरील इमारतीतच गुन्हे शाखा युनिट सहाचे कार्यालय आहे. काही वेळानंतर सोसायटीतील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपींना लातूर येथून ताब्यात घेतले असून त्यांना वाघोली येथे आणण्यात येत आहे. खुनामागील नेमके कारण पुढील तपासातून स्पष्ट होणार असून अधिक तपास वाघोली पोलीस करीत आहेत.