पूजा भाडळे यांचा केला पराभव ; गोगावले वाघोलीच्या ‘२९’व्या उपसरपंच
वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलच्या मालती गणेश गोगावले यांनी वाघेश्वर पॅनेलच्या पूजा भाडळे यांचा एका मताने पराभव करून विजय मिळविला. गोगावले यांना ९ तर भाडळे यांना ८ मते मिळाली. दोघांनाही मतदान केल्याने एक मत बाद झाले. गोगावले या चालू पंचवार्षिक निवडणुकीतील ८ व्या तर वाघोली ग्रामपंचायतीच्या २९ व्या उपसरपंच म्हणून विराजमान झाल्या आहेत.
रोहिणी गोरे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच वसुंधरा उबाळे यांनी मंगळवार (१४ जुलै) रोजी उपसरपंच पदाची निवडणूक लावली होती. उपसरपंच पदासाठी ग्रामविकास पॅनेलच्या मालती गोगावले, रेश्मा पाचारणे, जयश्री काळे यांनी तर वाघेश्वरच्या पॅनेलच्या पूजा भाडळे, वंदना दाभाडे यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारी घेण्याच्या वेळेस दाभाडे, काळे, पाचारणे यांनी अर्ज माघारी घेतले.
मालती गोगावले व पूजा भाडळे यांचा अर्ज राहिल्याने निवडणूक लावण्यात आली. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीतील मतदानामध्ये गोगावले यांना ९ तर भाडळे यांना ८ मते पडली. दोघांनाही मतदान केल्याने एक मतपत्रिका बाद झाली. एका मताधिक्याने मालती गोगावले यांना विजयी घोषित करण्यात आले. कोरोनाचे संकट आणि वाघोलीत सुरु असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे शासकीय नियमांचे पालन करत शांततेतच विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.
परिवर्तनाची वाघोलीकारांमध्ये होती चर्चा ; मात्र ग्रामविकासची बाजी
उपसरपंच निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलकडे १० तर वाघेश्वर पॅनेलकडे ८ मतदान आहे. या उपसरपंच निवडणुकीमध्ये वाघेश्वर पॅनेलने उपसरपंचपद खेचून आणण्यासाठी जोरदार तयारी केली होती. वाघेश्वर पॅनेलने आवश्यक असणाऱ्या मतदानाच्या आकड्याची जुळवाजुळव केल्याची बोलले जात होते. त्यामुळे वाघेश्वरचा उपसरपंच होऊन परिवर्तनाची जोरदार चर्चा वाघोलीकरांमध्ये होती. मतदानानंतर मात्र चित्र स्पष्ट झाले आणि ग्रामविकास पॅनेलने नेहमीप्रमाणे बाजी मारून उपसरपंचपद आबाधित राखले.