वाघोली – कुठलीही पूर्व सूचना न देता पुणे शहर वाहतूक उप-आयुक्त कार्यालयाकडून गुरुवारी बंद करण्यात आलेला वाघोली-लोहगाव रस्ता तात्काळ खुला करावा अशी मागणी व्यावसायिक व ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे वाहतूक शाखेचे उपआयुक्त राहुल श्रीरामे यांचेकडे करण्यात आली आहे. त्वरित रस्ता खुला करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक रहिवाशांसह व्यावसायिकांनी दिला होता. याबाबत दैनिक प्रभात मध्ये वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते. ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्रा लक्षात घेऊन शिरूर हवेलीच्या आमदार अशोक पवार यांनी वाहतूक उपायुक्त यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून तातडीने रस्ता खुला करावा याबाबत सांगितले होते.
तर अष्टविनायक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांची भेट घेऊन असता खुला करण्याबाबत विनंती केली होती.वाघोलीचे पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे नेते संदीप थोरात, वाघोली तंटामुक्ती समिती अध्यक्ष सचिन काळे व ग्रामस्थांनी रस्ता तातडीने खुला करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींचा आक्रमक पावित्रा लक्षात घेऊन वाहतूक विभागाच्या वतीने वाघोली लोहगाव रस्ता खुला करण्यात आला . शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, वाघोली चे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, अष्टविनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी विक्रम वाघमारे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, व्यापारी यांच्या उपस्थितीत रस्ता खुला करण्यात आला.
“वाघोली लोहगाव रस्त्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना ग्रामस्थ व व्यापारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आमदार अशोक पवार यांनी ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करून रस्ता खुला करण्यासाठी वाहतूक उपायुक्त यांना फोन करून रस्ता तातडीने खुला करण्याबाबत सूचना केल्याने हा रस्ता खुला झाला आहे. वाघोलीतील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, तरुण मंडळे यांनी देखील या रस्त्यासाठी एक लढा उभा केला होता. अखेर त्यास यश मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.” – बाळासाहेब सातव पाटील (उपाध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)