वाघोली – वाघोली तालुका हवेली येथील ग्रामपंचायत लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. याच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले पथदिवे केवळ ग्रामपंचायतीच्या वतीने वीज बिलाचा भरणा महावितरणकडे न केल्याने बंद असून जर विज बिल भरता येत नसेल ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, असे वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी म्हटले आहे.
याबाबत वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले की,
वाघोली तालुका हवेली येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीत वाघोली ग्रामपंचायतीने गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक चौक, रस्ते यांच्या भोवती पथदिव्यांची उभारणी केली आहे.
पथदिवे यांसाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जवळपास तीन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. वाघोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत जवळपास महावितरणने 43 मीटर दिले असून या 43 मीटर द्वारे वाघोलीतील पथदिव्यांना विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र जवळपास दीड कोटी रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरण ने पथदिव्यांची वीज तोडल्याने वाघोली अंधारात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे वाघोलीतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.विज बिल भरता येत नाही तरीही पथदिव्यांची कामे अजूनही वाघोली मध्ये सुरू असून वाघोली मध्ये महावितरण कार्यालयाकडे जवळपास आठ मीटरची अजून ही मागणी केली गेली आहे.
वीज बिलाचा भरणा वेळेवर करता येत नसेल कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असणारी ग्रामपंचायत व त्यांचे पदाधिकारी करतात काय सवाल माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी उपस्थित केला आहे. वाघोली मध्ये पथदिव्यांची वीज बिलाचा भरणा तातडीने करून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
“वाघोली मधील पथदिव्यांच्या बाबत वीज बिलाचा भरणा न केल्याने महावितरण कडून कारवाई करण्यात आली आहे. वाघोली ग्रामपंचायतीला महावितरणकडून वेळोवेळी योग्य ते सहकार्य झाले असून जवळपास दीड कोटी रुपयांच्या आसपास थकबाकी असून ही थकबाकीची रक्कम तातडीने भरण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन यांनी सहकार्य करावे.” – गणेश श्रीखंडे
(सहायक अभियंता, वाघोली महावितरण कार्यालय)
“वाघोली तालुका हवेली येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणार्या सन 2019 पर्यंत राज्य सरकारने वीज बिलाचा भरणा केला आहे. 2020 नंतरच्या वीज बिलाच्या थकबाकी बाबत हप्ता बांधून घेऊन पथदिव्यांच्या वीज बिलाच्या बाबतीत मागील वेळेस पाच लाख रुपयांचा भरणा केला गेला आहे. उद्या जवळपास सहा लाख रुपयांचा वीज बिल भरणा ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरण कार्यालयाकडे करण्यात येणार आहे.”
– अनिल कुंभार, (ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत वाघोली)
थकबाकीच्या बिलावर व्याजाची आकारणी होते?
वाघोली तालुका हवेली येथे ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची बिल थकबाकीत गेले आहे. या वीज बिलाचा भरणा पूर्णपणे केला नाही तर त्या बिलावर व्याजाची आकारणी होत असून ही व्याजाची आकारणी जवळपास लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे पथदिवे उभारणी करताना विज बिलाच्या आकड्याकडे देखील ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे होते.