वाघोली – महावितरणचे हडपसर विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमित भरते यांची आळेफाटा येथे बदली झाली असून त्यांच्या बदलीला वाघोली मधून तीव्र विरोध होत असून तातडीने त्यांची बदली रद्द करण्याची मागणी महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.
हडपसर ग्रामीण उपविभाग उपकार्यकारी अभियंता अमित भरते यांनी हडपसर विभागाअंतर्गत वाघोली, पेरणे, उरुळी देवाची, फुरसुंगी या भागामध्ये करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे काम केले आहे. रात्री-अपरात्री वेळोवेळी तांत्रिक अडचणीमुळे गेलेली वीज तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोत्तम सेवा दिली आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये करोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव च्या काळात वर्क फ्रॉम होम मध्ये कामगार, कारखानदार, सामान्य नागरिकांना विजेची समस्या भेडसावू नये यासाठी महावितरण कडून उत्तम सेवा देण्यासाठी अमित भरते आणि त्यांच्या सर्व कर्मचारी वर्गाने अविरत प्रयत्न केले होते. अमित भरते यांची बदली झाल्याने वाघोली मध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून वाघोली मधील अतिरिक्त विजेची समस्या सोडवण्यासाठी भरते आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून चांगल्या प्रकारे प्रयत्न केले जात असतानाच त्यांची बदली झाल्याने पुढील काळात वाघोली मध्ये विजेची समस्या गडद होऊ शकते यामुळे त्यांची बदली तातडीने रद्द करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
वाघोली,फुरसुंगी, देवाची उरुळी या भागातील काही गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने या भागातील विजेची समस्या सोडवण्यासाठी भरते यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज होती मात्र त्यांची बदली झाल्याने ही समस्या विदारक रूप धारण करू शकते अशी नागरिकांकडून जोरदार चर्चा आहे.शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी देखील निवेदनाद्वारे अमित भरते यांची बदली रद्द करण्याची मागणी मुख्य अभियंता पुणे ग्रामीण यांच्याकडे केली आहे.
“अमित भरते यांची बदली रद्द करण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे साहेब व मुख्य अभियंता पुणे ग्रामीण यांचेकडे बदली रद्द करण्यासाठी लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. अमित भरते यांच्याकडून वाघोली परिसरामध्ये महावितरणकडून उत्तम सेवा देण्याचे काम झाले आहे.” – अशोक पवार (आमदार, शिरूर हवेली विधानसभा)
“हडपसर ग्रामीण विभाग यांच्या अंतर्गत अमित भरते यांच्याकडून वाघोली आणि परिसरामध्ये महावितरण कडून उत्तम सेवा देण्याचे काम झाले असून त्यांची बदली रद्द करण्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहे.”
– रामभाऊ दाभाडे (माजी जिल्हा परिषद सदस्य)
“मुख्य कार्यकारी अभियंता यांनी पदाचा गैरवापर करून जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी व त्यांनी सांगितलेले चुकीचे नियम बाह्य कामे करण्यास नकार दिला म्हणून अमित भरते यांचा राग मनात धरून त्याचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी नियमबाह्य बदली केली आहे. बदली त्वरीत रद्द केली नाही तर भाजप तीव्र आंदोलन करणार आहे.”
– संदीप सातव (संघटन सरचिटणीस, पुणे जिल्हा युवा मोर्चा भाजपा)