वाघोली (प्रतिनिधी) : वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील एका प्लॉटिंगमध्ये वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबीयांकडे ठाणे जिल्ह्यातून आलेल्या २९ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. तरुण सपत्नीक ठाणे येथून आल्यानंतर खाजगी लॅबमध्ये केलेल्या कोरोना टेस्टमध्ये रिपोर्ट बुधवारी (दि.२७) सकाळी पॉजिटिव्ह आला आहे.
सदरचा तरुण ठाणे महानगर पालिकेमध्ये काम करीत आहे. त्याच्या संपर्कातील एकाला कोरोनाची बाधा झाली असून त्याला सर्दी जाणवू लागल्याने खाजगी लॅबमध्ये टेस्ट केली होती ती पॉजिटिव्ह आली. तरुणाला पुढील उपचारासाठी पुणे शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले आहे.
वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्या वतीने रुग्णाच्या घर परिसरामध्ये औषध फवारणी करण्यात आली असून सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचे हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांनी सांगितले.