थ्री स्टार मानकासाठी जिल्हाधिकारी, आयुक्तांनी काढले पत्रक
नगर – केंद्र शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिकेने सहभाग नोंदविला आहे. थ्री स्टार’ रॅंकींग मिळविण्यासाठी मनपाकडून युध्दपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. वोल्या कचऱ्याची विल्हेवाट लावने गरजेचे असून, त्यासाठी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेर्दी यांनी होम कंपोस्टिंग करणे कर्मचाऱ्यास बंधनकारक केले आहे.
तसेच या प्रकल्पाचे छायाचित्र काढून विभाग प्रमुखांना देवून त्याचा अहवाल आस्थापना विभागाकडे सादर करावा लागणार आहे. जे कर्मचारी उपक्रमात सहभागी होणार नाहीत त्यांचे वेतन डिसेंबर पासून देण्यात येणार नसल्याचे पत्रकात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छता सर्वेक्षणाबाबत जनजागृती व प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून स्वच्छताविषयक उत्कृष्ट काम करणाऱ्या 32 सफाई कर्मचाऱ्यांसह शासकीय कार्यालये, शाळा, हॉटेल व हॉस्पिटल अशा 12 संस्थांचा गौरव करण्यात आला. कचऱ्या विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात या उद्देशाने अशा संस्थांपैकी उत्कृष्ट काम करणाऱ्यांचाही गौरव मनपाकडून करण्यात आला.
स्वच्छता विषयक कामकाजात सुधारणा करण्यासाठी मनपाकडून उपाययोजना सुरू आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हरित लवादाच्या निर्देशानुसार प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. घर ते घर कचरा संकलनासाठी खासगी संस्थेमार्फत नुकतेच काम सुरू करण्यात आले आहे. त्यात येणाऱ्या अडचणीही सोडविल्या जात आहेत. मात्र, यात नागरिकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वात पहिले कर्मचाऱ्यांच्या घरात होम कंपोस्टिंग करणे बंधनकार केले असून असा परिपत्रक द्विवेदी यांनी काढले आहे.