प्रशासनाचे दुर्लक्ष : नवीन विभागांसाठी अद्याप धोरणही नाही
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेसाठी 49 विविध प्राध्यापकांची भरती करण्यात आली आहे. तर नवीन विभाग करण्यासाठी अजून काही प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे. मात्र एक वर्षापूर्वी भरती केलेले प्राध्यापक डॉक्टर अजूनही मानधनावरच काम करत असल्याचे समोर आले आहे. त्यांना शासनाच्या सरळसेवा पद भरतीचा कोणताही फायदा दिला जात नाही.
संत तुकारामनगर येथे महापालिकेचे 750 खाटांचे वायसीएम रुग्णालय आहे. या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. रुग्णालयात अस्थिरोग, नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, कर्करोग, दंतरोग असे विविध विभाग आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या सात अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली.
यामध्ये कान, नाक, घसा यासाठी तीन विद्यार्थी, भूलशास्त्र (4), मानसोपचार (3), अस्थिरोग (4), स्त्रीरोग आणि प्रसुती (3), बालरोग (4), विकृतीशास्त्र (3) हे सात अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. या नवीन अभ्यासक्रमासाठी 9 प्राध्यापक, 17 सहयोगी प्राध्यापक तसेच 23 सहायक प्राध्यापक मानधनावर घेण्यात आले. त्यावेळी महापालिका प्रशासनाच्या वतीने या डॉक्टरांना सरळसेवेनुसार भरती करून घेतले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र एक वर्ष उलटूनही या प्रक्रियेला मूर्त स्वरुप प्राप्त झाले नाही. 3 ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये या प्राध्यापक डॉक्टरांच्या मुलाखती पार पडल्या मात्र त्यानंतर दोन महिने उलूटनही त्यांना सरळसेवेचा कोणताही लाभ देण्यात आला नाही. तसेच त्याबाबत काही कळविण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे या प्राध्यापकांबद्दल प्रशासनाची अनास्था असल्याचे दिसून येते.
वैद्यकीय पदव्युत्तर संस्थेसाठी नवीन अभ्यासक्रमांची प्रक्रिया मार्च महिन्यामध्ये पार पडते. नवीन विभाग सुरु करण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषद नवी दिल्ली यांची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी प्रस्ताव तयार करतेवेळी नवीन विभागांसाठी आवश्यक असलेले प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची भरती करणे आवश्यक असते. या वर्षी क्ष- किरण शास्त्र, नेत्र विभाग, त्वचारोग, उरोरोग (छातीशी संबंधित आजार), सामाजिक प्रतिबंधात्मक व सामाजिक औषधशास्त्र विभाग असे पाच विभाग सुरू करण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे.
मात्र या विभागासाठी आवश्यक असलेली पदे भरण्यास अद्याप प्रशासनाला मूहर्त सापडलेला नाही. 15 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये या नवीन विभागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पार पाडायची आहे. त्यापूर्वी या पदांची भरती केली नाही तर नवीन विभागांना भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून परवानगी मिळणार नाही. वायसीएम रुग्णालयात आठ प्रकारच्या विशेष सेवा उपलब्ध आहेत. वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असते. त्यामुळे रुग्णांची अडचण होते. या ठिकाणी पूर्णवेळ, नियमित आणि तज्ज्ञ वैद्यकिय अधिकारी उपलब्ध व्हावेत. यासाठी रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतला होता.
सत्ताधाऱ्यांचे तोंडावर बोट
मागीलवर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्यानंतर सत्ताधारी भाजपाने मोठा गाजावाजा करत शाबासकीची थाप घेतली होती. वैद्यकीय महाविद्यालय चालविणारी पिंपरी चिंचवड देशातील एकमेव महापालिका असल्याचे सांगत कौतुक करवून घेतले होते. संस्था सुरू झाल्यानंतर वायसीएम रुग्णालयामध्ये आमूलाग्र बदल होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. तसेच यामुळे वायसीएमवरील ताण कमी होणार असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. तसेच पदव्युत्तर संस्था सुरू झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर अनास्थेचे ग्रहण लागलेले दिसून येत आहे. प्राध्यापकांना सरळसेवेतून भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांना वारंवार आश्वासने दिली जात आहेत. तसेच नवीन विभागासाठी पदभरती करण्याकडेही दुर्लक्ष केले आहे.
वायसीएम वैद्यकीय पदव्युत्तर संस्थेतील प्राध्यापकांच्या मुलाखती झाल्या आहेत. सरळसेवेतून पदे कायम करण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. पुढच्या पंधरा दिवसांत ती पूर्ण होऊन त्या प्राध्यापकांची सरळसेवेतून भरती केली जाईल. नवीन विभागासाठी पदे भरण्यासाठी अद्याप धोरण आखलेले नाही. त्यासाठी धोरण निश्चित करावे लागेल.
– मनोज लोणकर, प्रशासन अधिकारी, पिं. चि. महापालिका.