गावांचा बदलता चेहरा (भाग-11) : वडमुखवाडीत अपुरा पाणीपुरवठा, प्रमुख सुविधांची मात्र पूर्तता

प्रतिनिधिक छायाचित्र

बावीस वर्षात गावाची शहराकडे वाटचाल

पिंपरी – वडमुखवाडी गावामध्ये अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, वीज, सांडपाणी नलिका आदी प्रमुख सुविधा झाल्या आहेत. विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे मात्र सुरू आहेत. स्मशानभूमीची सोय नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प झाले आहेत. संबंधित गृहप्रकल्पांची पाण्याची मागणी मोठी आहे. तुलनेत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

वडमुखवाडी गावाचा परिसर गेल्या 22 वर्षांमध्ये बराच बदलला आहे. गावामध्ये सध्या चौथीपर्यंतची शाळा आहे. ही शाळा दहावीपर्यंत करण्याची गरज आहे. तसेच, इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करायला हवी. गावामध्ये दवाखान्याची सोय नसल्याने नागरिकांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो. किमान बाह्यरूग्ण विभाग सुरू होणे आवश्‍यक आहे. स्मशानभूमीची मोठी समस्या असल्याचे ग्रामस्थ आवर्जून सांगतात.

गावात स्मशानभूमी नसल्याने आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीतील स्मशानभूमीत जावे लागते. महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव आहे. विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. भाजी मंडई नसल्याने महिलांना भाजी खरेदीसाठी चऱ्होली येथे जावे लागते. वाड्यावस्त्यांवर वीजेचा लपंडाव सुरू असतो. अशा विविध समस्या सुनील तापकीर, प्रणव तापकीर, महादेव तापकीर, आदित्य तापकीर यांनी मांडल्या.

वडमुखवाडी येथे विकासकामांसाठी 19.34 हेक्‍टर क्षेत्रावर 28 आरक्षणे टाकलेली आहेत. त्यातील 3.80 हेक्‍टर क्षेत्राचा ताबा महापालिकेकडे आलेला आहे. तर, अद्याप 15.54 हेक्‍टर क्षेत्राचा ताबा मिळणे बाकी आहे.

“गावामध्ये महापालिकेचा दवाखाना उभारणे गरजेचे आहे. विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे मार्गी लागायला हवी. येथील स्मशानभूमीची समस्या सोडविणे आवश्‍यक आहे. स्मशान दाखल्याची सुविधा परिसरापासून जवळ असलेल्या महापालिकेच्या दवाखान्यात व्हायला हवी. पुणे-आळंदी रस्ता ते वडमुखवाडी (बोंबले वस्ती) या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
– सुरेखा माटे, माजी नगरसेविका

काय हव्या सुविधा :

* भाजी मंडई, महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह
* महापालिकेचा दवाखाना, उद्यान, स्मशानभूमी
* भुमीगत विद्युततारांची कामे, खेळाचे मैदान

“वडमुखवाडी परिसरातून जाणाऱ्या पुणे-आळंदी रस्त्याचे काम झालेले आहे. साई मंदिराच्या शेजारी संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचे शिल्प उभारण्यात येणार आहे. परिसरामध्ये सिमेंटच्या अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. भूमीगत केबलचे काम करण्यात आले आहे. विकास आराखड्यातील तीन रस्त्यांची कामे सुरू आहेत.
– नितीन काळजे, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)