वाडिया रूग्णालयाला मिळाला ऑक्‍सिजन

महापालिका 22 कोटी, तर राज्य सरकार 24 कोटी देणार
मुंबई : निधीअभावी व्हेटिंलेटवर असलेल्या मुंबईतील वाडिया रुग्णालयाला अखेर मुंबई महानगरपालिका तसेच राज्य सरकारकडून ऑक्‍सिजन मिळाला. निधी मिळत नसल्याने रुग्णालय प्रशासनाने रुग्णालय बंद करण्याच्या निर्णयाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात तातडीची बैठक बोलावली.

या बैठकीत सरकारकडून 24 कोटी रुपये तत्काळ देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याचप्रमाणे महापालिकेकडून 22 कोटींचा निधी वाडिया रुग्णालयाला दिला जाणार आहे. निधी देण्याच्या निर्णयानंतर तत्काळ रुग्णसेवा सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

राज्य सरकार आणि पालिकेकडून अनुदान थकित असल्याचा दावा करीत परळ येथील जेरबाई वाडिया लहान मुलांचे रूग्णालय आणि नौरोजी वाडिया प्रसितीगृह बंद करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात राजकिय पक्षांनी पुढाकार घेत सरकार व पालिकेविरोधात आंदोलन छेडले होते.

रुग्णालय बंद पडल्यास गरीब रूग्णांची गैरसोय होईलच, त्याशिवाय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरही बेकारीची टांगती तलवार उभी राहिली होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.