मुंबई – डिएचएफएलने 2.60 खोट्या गृह कर्ज खात्यांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेमध्ये मोठा घोटाळा केला आणि त्या माध्यमातून सरकारकडून 1880 कोटी रुपयांचे व्याज अनुदान लाटल्याचा आरोप ठेवत सीबीआयने डीएचएफएलच्या मालकांवर गुन्हा नोंद केला आहे.
डीएचएफएलचे कपिल वाधवान आणि धिरज वाधवान यांच्या विरोधात सीबीआयने सरकारचे अनुदान लाटल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी मुंबईतील बांद्रा येथे एक डीएचएफएलची एक खोटी शाखा उघडली आणि त्यामाध्यमातून 14,046 कोटी रुपयांची पंतप्रधान आवास योजनेची खोटी कर्ज खाती तयार केली. ज्यांच्या नावावर खाती काढण्यात आली होती त्या ग्राहकांनी आपले कर्ज आधीच भरले होते. या खात्यांना डेटाबेसमध्ये टाकण्यात आले.
कपिल वाधवान आणि धिरज वाधवान हे दोघे येस बॅंक घोटाळ्याच्या संबंधित मनी लॉन्ड्रिगच्या आरोपाखाली आधीपासूनच तुरुंगात आहेत. आता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 1,887 कोटी रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी त्यांनी खोटी खाती तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सीबीआयने सांगितल्या प्रमाणे, डिसेंबर 2018 पर्यंत डीएचएफएलने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 539.40 कोटी रुपयांचे अनुदान असलेली 88,651 खोटी कर्ज प्रकरणे करण्यात आली. 2007 ते 2019 या दरम्यान खोट्या कर्ज खात्यांच्या माध्यमातून 14,046 कोटी रुपयांची 2.60 लाख खोटी गृह कर्ज खाती तयार करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे ही खाती मुंबईतील बांद्रा येथील अशा शाखेत काढण्यात आली जी बॅंक कधीच अस्तित्वातच नव्हती. एका वाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने संकेतस्थळावर ही बातमी दिली आहे.