वडगावचा पाझर तलाव भरला

वडगांव हवेली – परिसरात सध्या पावसाची संततधार सुरु असून दमदार पावसाने शेतकरी वर्ग सुखावला आहे. येथील पाझर तलाव पूर्णपणे भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागला आहे.

मध्यंतरी काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने सर्वत्र दमदार सुरुवात केली आहे. परिसरातील ओढे, नाले, तुडूंब भरून वाहू लागले आहेत. शेतीमध्ये पेरणी, टोकणी झालेल्या भुईमुग, सोयाबीन व इतर कडधान्य या खरीप पिकांना तसेच ऊस लागवड झालेल्या क्षेत्राला हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. चार दिवसांपासून संततधार पाऊस असल्याने कोळपणी, भांगलणीची कामे ठप्प झालेली आहेत. पावसामुळे परिसरात काही घराच्या भिंती जीर्ण झाल्याने त्या पडल्याने नुकसान झाले आहे.

परिसरात डोंगर कपारीतून पाणी वाहू लागले आहे. येथील सिद्धेश्वर मंदिरानजीक असणारा पाझर तलाव पूर्णपणे भरला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी बाहेर पडू लागले आहे. या तलावमधून पाणी बाहेर पडून ओढे नाले वाहिल्यानंतर वर्षभर शेतीसाठी परिसरात पाण्याची कमतरता भासत नाही. काही दिवसांपूर्वी पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने पेरणी झालेली खरीप पिके पाण्याअभावी धोक्‍यात येण्याची शक्‍यता होती. तसेच ऊस लागवड ही थांबल्याचे दिसत होते. परंतु गेली चार दिवसांपासून पावसाची दमदार सुरुवात होऊन संततधार कायम राहिल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे सुखावला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.