चंद्रपूर : कॉंग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची आकापूर येथे प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांची लेक शिवानी वडेट्टीवार यांनी जोरदार भाषण केले आहे. मात्र यावेळी बत्तीगुल झाल्याचे बघून महावितरण विभागावर देखील त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली आहे.
या गावात अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आले. जेव्हा शिवानी वडेट्टीवार गावात पोहोचल्या, तेव्हाही वीज गेलेली होती, त्यामुळे त्यांनी मोबाइलच्या टॉर्चच्या प्रकाशात सभा घेतली. यावेळी त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचे समोर आले आहे.
वडेट्टीवार म्हणाल्या, तुमचे जीवन अंधारात टाकायचे काम भाजप सरकार करत आहे. महावितरणवाल्याला झापणार तर आहे, त्याची नाही काढली तर माझं नाव शिवानी विजय वडेट्टीवार नाही. रात्रभर वीज घालवूनही यांना 800-1000 रुपये बील पाठवायला लाज वाटत नाही. या लोकांची आम्ही फजिती करू. भाजप सरकारच्या कोणत्याच भूलथापांना बळी पडू नका. विजू भाऊंना बहूमताने निवडून द्यायचे आहे.
विजू भाऊ उद्याचे मुख्यमंत्री…
विकास गुजरातचा होत आहे, तुमच्या गावाचा नाही. तुमच्या जीवनात अंधार पेरण्याचे काम भाजप करत आहे. तसेच, उद्या विजू भाऊ मोठ्या पदावर जाऊ शकतात. ते विरोधी पक्ष नेते असून उद्याचे मुख्यमंत्री असू शकतात, असे सांगत शिवानी वडेट्टीवार यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले.