पुणे – लोकसभा निवडणुकीत यंदा ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) वापरण्यात आले. या सुविधेमुळे मतदाराला आपले मत कोणाला दिले हे प्रिंट स्वरूपात दिसले. मतमोजणी मात्र ईव्हीएमवरील मतदानाची होणार आहे. फक्त लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची मतमोजणी करण्यात येणार आहे.
यामुळे एका लोकसभा मतदारसंघातील 30 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांवरील मते आणि ईव्हीएमवरील मते यांचा ताळमेळ घेतला जाणार आहे. दरम्यान, मतमोजणी दि.23 मे रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने पावले उचलली. निवडणूक पूर्णपणे पारदर्शी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरुवातीला ईव्हीएम वापरण्यास प्रारंभ केला होता.
यानंतर, ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटही जोडले गेले. निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांना नवीन ईव्हीएम (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट) आणि व्हीव्हीपॅट मशीन दिले आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी 16 हजार 927 बॅलेट युनिट, 9 हजार 870 कंट्रोल युनिट आणि 11 हजार 81 व्हीव्हीपॅट मशीन दिले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आले.व्हीव्हीपॅट ही यंत्रणा वापरण्यात येत असली तरी मतमोजणी मात्र ईव्हीएमची होणार आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची मतमोजणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.