व्हीव्हीपॅट मशीन्स बंद पडल्याने प्रशासनाची झाली दमछाक

अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग, वाईत 55 टक्के मतदान

प्रशासनालाच नाही गांभीर्य

वाई शहरात अनेक ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडले. या प्रकारामुळे वादावादीचे प्रसंगही निर्माण झाले. तसेच बराच वेळानंतरही मशीन सुरू न झाल्याने अनेक मतदार मतदान न करताच माघारी निघून गेले. दरम्यान, या मतदारांना मतदान करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही. याशिवाय तालुक्‍यातील अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याप्रकरणी प्रशासनास लेखी निवेदनेही दिले होते. मात्र, संबंधितांनी त्या गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन मतदान करण्यासाठी जागृती करणे गरजेचे होते. परंतु, तसे कोणतेही प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आले नसल्याने लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या निवडणुकींबाबत प्रशासनालाच गांभीर्य नसल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे.

वाई  – वाई विधानसभा मतदार संघात व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याने मतदारांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे काही ठिकाणी एक तास वाढवून देण्यात आला तर किरकोळ बिघाड झालेल्या ठिकाणी वेळ वाढवून देण्यात न आल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण झाले. व्हीव्हीपॅट मशिनच्या बिघाडामुळे काही ठिकाणी लोकांच्या उत्साहावर विरजण पडले. त्यातच काही आज शिळी यात्रा असल्याने मतदार मतदान न करताच परत फिरला.

सकाळी उत्साहाच्या वातावरणात मतदान करण्यासाठी मतदारांनी चांगली गर्दी केल्याचे दिसून आले. परंतु, व्हीव्हीपॅट मशिनच्या बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मतदारांना मतदान करता आले नाही. तर काही गावांनी पाण्याची समस्या गंभीर असल्याने मतदानावर बहिष्कार टाकला. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेचा प्रारंभ झाला तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असल्याने सकाळ व संध्याकाळी मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजाविला.

उन्हाची तीव्रता जास्त असल्याने मतदार राजा मतदानासाठी बाहेर पडला नाही. त्यामुळे मतदान केंद्रावर दुपारच्या वेळेस शांतता दिसून आली. सकाळी आकरा वाजेपर्यंत 21 टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत 34 टक्के मतदान झाले. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाले. तर संध्याकाळी सहा वाजता वाई विधानसभा मतदार संघाचे 55 टक्के मतदान झाले. काही मशिनच्या तांत्रिक अडचणी सोडल्या तर बाकी मतदान सुरळीत पार पडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.