डिसेंबरपर्यंत बसविणार आधुनिक यंत्रणा; 85% काम पूर्ण
पुणे/पिंपरी – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) 18 हजार गाड्यांना डिसेंबरपर्यंत “व्हीटीएस’ (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) प्रणाली बसविण्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. यामुळे प्रवाशांना एसटी गाड्यांचे “लोकेशन’ कळणार आहे.
एसटीच्या साध्या बसगाड्यांसह वातानुकूलित बसगाड्यांनाही “व्हिटीएस’ प्रणाली कार्यान्वित करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. जवळपास 85 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. काही किरकोळ कामे नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करून डिसेंबरपासून ही सेवा प्रवाशांसाठी कार्यान्वित होईल, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्याचे वेळापत्रक सुधारावे आणि प्रवाशांना बसचे “लोकेशन’ समजावे, यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी “व्हीटीएस’ प्रणालीचा शुभारंभ केला होता. नाशिक एसटी आगारातील गाड्यांवर हा प्रयोग सुरू झाला. प्रयोग सुरू असतानाच राज्यातील एसटीच्या अन्य विभागातही प्रणाली बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मार्च 2020 पर्यंत सर्व बसगाड्यांना “व्हीटीएस’ बसवून प्रवाशांच्या सेवेत आणली जाणार होती. मात्र, करोनाकाळात हे काम पूर्णपणे थांबले होते. मात्र, पुन्हा या कामाला पुन्हा सुरुवात झाली असून, एसटीच्या ताफ्यातील 18 हजार 500 गाड्यांपैकी 16 हजार गाड्यांना नवीन प्रणाली बसवून झाली आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे.