कराड – सातारा लोकसभेच्या पोट निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. कराड उत्तर मतदारसंघात लोकसभेच्या मतदान प्रक्रियेसाठी 404 मतदार यंत्रे येथील नूतन प्रशासकीय कार्यालयात सील करण्यात आली आहेत. मतदार संघातील 336 मतदान केंद्रासाठी 2 हजार 352 कर्मचाऱ्यांसह 437 व्हीव्हीपॅट सज्ज झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिली.
येत्या सोमवार दि. 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीबरोबर लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. कराड उत्तर मतदारसंघात 336 मतदान केंद्रात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या 336 मतदान केंद्रासाठी प्रत्येक एक कंट्रोल युनिट (सी. यू.) व एक बॅलेट युनिट (बी. यू.) व एक व्हीव्हीपॅट अशा 336 मशिनचा वापर होणार असल्याचे वरखेडकर यांनी सांगितले.
कराड उत्तरमधील या 336 मतदान केंद्रामधून एकूण 2 हजार 352 कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी व कर्मचारी सुट्टीदिवशीही हजर राहून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी चोवीस तास कार्यरत आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी विशेष पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणूक अधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक अधिकारी अमरदीप वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी 404 सीयू, 404 बीयू व 437 व्हीव्हीपॅट मशीन इन कॅमेरा चेक करुन सील केल्या आहेत.
याशिवाय मतदान केंद्रावर लागणारे अन्य साहित्यही एकत्रित करण्यात आले आहे. मतदान मशिन ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. त्या परिसरातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले असल्याची माहिती विद्युत वरखेडकर यांनी दिली.