मतदानाचा व्हिडिओ व्हायरल

नगर – जिल्ह्यात काही विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना करण्यात आलेल्या मतदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने मतदान केंद्रावरील सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

मतदान केंद्रांच्या 100 मीटर अंतरापर्यंत मोबाइल घेवून जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असतानाही अनेक मतदार थेट मतदान केंद्रात मोबाइल घेवून जात होते. त्यातून मतदान केंद्रात कोणाला मतदान केले त्याचा थेट व्हिडिओ काढून तो सोशल मीडीयावर व्हायरल करण्यात आला. मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाने यापूर्वीच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत.

मतदान करताना मोबाइल जवळ बाळगण्यासदेखील बंदी घातली आहे.   परंतु असे असूनही काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मोबाइलमध्ये आपण मतदान करतानाचे हे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. अनेक मतदान केंद्रांवर पोलिसांनीही मोबाइल बंदी घातली आहे. परंतु काही अति उत्साही कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून मोबाइल मतदान केंद्राच्या आत घेऊन जात आहेत. यातून या मोबाइल बंदीचा फारसा फायदा झाला नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे.

पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांना मतदान केल्याचे ईव्हीएम मशीनवर बटन दाबतांना तसेच व्हीव्हीपॅट मधील मतदान झाल्याची चिठ्ठी देखील या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आली आहे. तसेच नगर शहरातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र पाथर्डीत मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी याच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.