कोलकता – पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात उद्या (गुरूवार) बहुप्रतीक्षित पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. त्यावर त्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे भवितव्य अवलंबून आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून तृणमूलने सलग तिसऱ्यांदा बंगालची सत्ता काबीज केली. मात्र, त्या निवडणुकीत ममतांना नंदीग्राम मतदारसंघात पराभूत व्हावे लागले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी ममतांना सहा महिन्यांच्या निर्धारित मुदतीत आमदार बनणे अनिवार्य ठरले.
आमदार बनण्याची संधी त्यांना भवानीपूरमधील पोटनिवडणुकीमुळे मिळाली आहे. त्यामुळे त्या पोटनिवडणुकीकडे बंगालबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ममतांविरोधात भाजपच्या प्रियांका टिबरेवाल आणि माकपचे श्रीजिब बिस्वास निवडणूक लढवत आहेत. त्या पोटनिवडणुकीचा निकाल 3 ऑक्टोबरला जाहीर होईल.
दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर भवानीपूर मतदारसंघात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेसाठी केंद्रीय दलांच्या 15 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.