दमास्कस (सिरीया) – नवीन संसद निवडावी तसेच करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात यासाठी सिरीयामधील बहुतांश भागामध्ये आज मतदन घेण्यात आले. सिरीयामध्ये 2011 पासून युद्धजन्य स्थिती आहे. तेंव्हापासोन अशाप्रकारे तिसऱ्यांदा सार्वत्रिक मतदान घेण्यात आले आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत 4 लाख जण ठार झाले असून देशातील लोकसंख्येपैकी निम्मेजण विस्थापित झाले आहेत. पन्नास लाखांपेक्षा अधिक लोकांनी शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे.
अमेरिकेने गेल्या महिन्यापासून सिरीयावर नव्यने निर्बंध लादले आहेत. तसेच भ्रष्टाचारामुळे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या अब्जाधीश चुलत बंधूंना लक्षावधी डॉलरची मालमत्ता सरकारला परत करावी लागली होती. याच वातावरणादरम्यान या वर्षीची निवडणूक होत आहे.
एकूण 250 सदस्यांची क्षमता असलेल्या पीपल्स असेंब्ली या संसदेतील सदस्यत्वासाठी सरकारची मान्यता असलेले 1,656 उमेदवार या वर्षीच्या निवडणूकीमध्ये उभे आहेत. मात्र निवडणूकीसाठी मान्यता असलेल्या एकूण मतदारांची संख्या मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.
सिरीयात पूर्वी झालेल्या मतदानाप्रमाणेच अध्यक्षांशी प्रामाणिक असे “रबर स्टॅम्प’ म्हटले जाणारे सरकार या निवडणूकीत देखील निवडून येईल, असे मानले जात आहे. या मतदानासाठी नागरिकांना मतदान केंद्रांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखावे लागले होते.