सोशल मीडियावर मतदानाचा फिव्हर

तरुणाईमध्ये सेल्फी क्रेझ : केंद्रांच्या सजावटीमुळे मतदारांमध्ये उत्साह

पुणे – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.21) एकाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रियेनंतर मतदान केल्याचे दाखविण्यासाठी सोशल मीडियावर सेल्फी, ग्रुप फोटो अपलोड करण्यात तरुणाईचा मोठा वाटा होता. त्यामुळे फेसबुक, व्हॉटस्‌अप, ट्‌विटर हा सोशल मीडिया दिवसभर मतदानाच्या फोटोंनी सजला होता.

निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर मतदारांनी डाव्या हाताच्या बोटावरील शाई दाखवत अनेकांनी मतदानाचे फोटो डिपीवर ठेवले होते. वैयक्‍तिक फोटोंबरोबरच कुटुंबासोबत, मित्र, मैत्रिणींसोबत मतदानानंतरचे काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकण्याची चढओढ लागली होती. वोट फॉर डमोक्रसी, मी मतदान केले, तुम्हीसुद्धा करा, मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावा असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यानिमित्ताने राज्यभरातील तरुणाई सोशल मीडियावर मतदानाबाबत सक्रिय असल्याचे दिसून आले. विशेषत: पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या तरुणाईमध्ये सेल्फीची मोठी क्रेझ होती.

सोशल मीडियाचा पुरेपुर वापर
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तरुणाईने या व्यासपीठाचा पुरेपुर वापर करत, दिवसभर हे व्यासपीठ मतदानाच्या छायाचित्रांबरोबरच समाजोपयोगी मेसेज पाठविण्याकरिता केला. राज्यातील मतदानाचा टक्‍का वाढावा, याकरिता निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविले होते. त्यामध्ये प्रभातफेरी, पथनाट्य, नवमतदारांसाठी महाविद्यालयांमध्ये व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. याला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमुळे दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.