पिंपरी विधानसभेत मतदान जनजागृती : मतदार नोंदणी विभागाचा उपक्रम
पिंपरी – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मतदार नोंदणी विभागामार्फत ठिकठिकाणी मतदानाची शपथ देण्यात आली. वल्लभनगर येथील एसटी आगार, एक्साईड बॅटरी कामगार आणि स्वामी विवेकानंद शाळेत आयोजित या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मतदार नोंदणी अधिकारी सुनील वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात लोकशाही समृद्ध व बळकट करण्यासाठी मतदानाचे आवाहन करण्यात आले. एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगारात स्वीप कक्ष प्रमुख मुकेश कोळप यांचे व्याख्यान झाले.
काळभोरनगर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. काळभोरनगर चौकात मतदान जागृतीबाबत व्याख्यान झाले व नागरिकांना मतदान जागृतीसाठी आवाहन करुन मतदानाची शपथ देण्यात आली. यावेळी स्वामी विवेकानंद विद्यामंदिराचे मुख्याध्यापक अलका पाटील, उप शिक्षक अर्चना राउत, सुजाता इंदुलकर, पुष्पा नेवरे, मंगेश देशमुख तसेच कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
चिंचवड येथील एक्साईड बॅटरी कंपनीतील दोन्ही शिफ्टमधील 500 कामगार व अधिकारी यांना मतदानाची शपथ देण्यात आलीत. मुकेश कोळप यांचे व्याख्यान झाले. यावेळी एक्साईड बॅटरी कंपनीचे प्रकल्प प्रमुख के. अनिरुद्धा, डीसील्वा, प्रफुल्ल जोशी आदी उपस्थित होते. तानाजी सावंत, सुशांत जोशी, विलास केंजळे, सुधीर दारोकार यांनी संयोजन केले.