भाजपच्या बुद्धिभेदाला मतदार भुलणार नाहीत

जयंत पाटील; महाविकास आघाडीची एकजूट, हीच विजयाची नांदी ठरेल

सातारा -पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची असलेली एकजूट हीच विजयाची नांदी ठरणार आहे. भाजपच्या बुध्दीभेदाला पदवीधर आणि शिक्षक मतदार भुलणार नाहीत, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीनंतर ना. पाटील बोलत होते. या पत्रकार परिषदेस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, प्रा. नितीन बानुगडे- पाटील, प्रभाकर घार्गे, सुनील माने, सारंग पाटील, प्रभाकर देशमुख, सत्यजितसिंह पाटणकर, प्रदीप विधाते, जयवंतराव केंजळे, दीपक पवार, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे प्राबल्य असल्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजय होतील यात तिळमात्र शंका नाही. मात्र पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गाफील न राहता एकजुटीने समन्वय साधत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे. प्रत्येक तालुक्‍यातील तिन्ही पक्षाच्या प्रमुखांवर जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप प्रत्येक निवडणुकीत मतदारांचा बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात महाविकास आघाडीची ताकद वाढल्याने आमच्या नेत्यांना टार्गेट करुन चुकीचा प्रचार करण्यात येत आहे. मात्र भाजपच्या भुलथापांना जनता आता थारा देणार नसून भाजपने मतदारांचा बुध्दीभेद करणे थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुणे जिल्ह्यात भाजपने चुकीच्या पध्दतीने मतदार वाढवले असल्याच्या तक्रारी आहेत या तक्रारीची शहानिशा करुन याबाबत दाद मागण्यात येणार आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगला समन्वय आहे. कोणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. सर्वांनी एकदिलाने काम करुन महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी कामाला लागावे, अशा सूचना देण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

“निधी देताय तशी मते पण त्यांना मागा’
सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. सातारा – जावळी मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींना डावलून भाजपच्या आमदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. त्यामुळे दादांना सांगा म्हणजे मते मिळतील. हाच धागा पकडत शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांनी जयंत पाटील यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीशी एकनिष्ठ राहायचे आणि वरच्या पातळीवर निधी मात्र भाजपच्या आमदारांना दिला जात आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सातारा – जावळीतही महाविकास आघाडीची मोठी ताकद असून या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना ताकद मिळावी, अशी अपेक्षा नरेंद्र पाटील यांनी बैठकीत व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.