#PhotoGallery : मतदारांनी उत्स्फूर्तपणे बजावला हक्क

पावसाच्या उसंतीने बूथवर नागरिकांची दिवसभर गर्दी

कराड – कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सोमवार, दिनांक 21 रोजी मतदानासाठी मतदार उस्फूर्तपणे बाहेर पडले. दोन दिवसापासून जोरदार पडणाऱ्या पावसाने आज पहाटेपासूनच उसंत दिली होती. सकाळी दहानंतर स्वच्छ आकाश झाल्याने मतदारांनी दिवसभर मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावलेल्या दिसत होत्या.

शहरातील 61 मतदान केंद्रावर लोकांची गर्दी होती. सकाळी धिम्यागतीने मतदान सुरू झाले. मात्र दुपारी बारानंतर गर्दीत वाढ झाली. शाळा क्रमांक तीनमध्ये लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण तर मंगळवार पेठेत आमदार बाळासाहेब पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवाजी विद्यालयामध्ये नामदार शेखर चरेगावकर यांनीही आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला. नगरसेवक, स्थानिक नेते यांची मतदारांना बाहेर काढण्यासठी धावपळ सुरू होती. बाहेर गावातून मतदारांना आणण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली होती.

कराड दक्षिणच्या ग्रामीण भागातही मतदारांमध्ये मोठा उत्साह पहावयास मिळाला. सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली. तेव्हा काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सकाळी धिम्या गतीने मतदान सुरू होते. अकरानंतर आकाश निरभ्र झाल्याने युवकांसह आबालवृद्धांनी मतदान केले. विधानसभेचे उमेदवार अतुल भोसले यांनी रेठरे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला, तर अपक्ष उमेदवार उदयसिंह पाटील यांनी देखील उंडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळच्या सत्रात मतदान केले. तिन्ही नेत्यांचे गट त्यांच्या परिने लोकांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते.

रिक्षा, वडाप जीप, दुचाकी तर गरज पडली तर मिनी बसची सोय करण्यात आली होती. शंभर मिटरच्या नियमाचेही पालन केले जात नव्हते. बाहेरील मतदारांना मतदानास आणण्यासाठी स्वंत्र वाहनांची व्यवस्था होती. आधीपासूनच हाय होल्टेज मतदारसंघात कराडचे नाव घेतले जात होते. त्याप्रमाणेच दक्षिण विधानसभा मतदार संघात चुरशीने मतदान होत आहे. पावसाने आज पूर्णत: उघडीप दिली. त्यामुळे तालुक्‍यात मतदानाला उत्साहात लोक बाहेर पडत होते.

रेठरे बुद्रुक, शेणोली, काले, ओंड, उंडाळे, घोगाव, विंग, मलकापूर, आगाशिवनगर, वडगाव हवेली भागात मतदानास लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी बारानंतर महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडला होता. एका मतदान केंद्रावर एक अधिकारी, तीन पोलिस व एक होमगार्ड बंदोबस्तास तैनात केले होते. दिवसभर उन्ह पडल्याने लोकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. ज्येष्ठ मतदारांनाही मताचा अधिकार बजावण्यासाठी आणले जात होते. वडगाव हवेली येथे 97 वर्षाच्या वृद्ध आजींनी मतदानाचा हक्क बजावला. विंग, उंडाळे यासह परिसरातील काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केंद्र होते. तर वडगाव हवेलीतील गावातील एकाच ठिकाणी चार मतदान केंद्र असल्याने तेथे गर्दी होती. कापील गोळेश्वर व कार्वे भागातही लोकांची गर्दी होती.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)