जळगाव: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला अवघे काही तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे एन वेळी मतदारांना पैसे वाटून त्यांचे मतदान वाळविण्यासाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघत पैसे वाटप करत असल्याची घटना समोर आली आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या दोन समर्थकांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना रंगेहात पकडले आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे शुक्रवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून, याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर अत्तरदे यांचे काही समर्थक म्हसावद गावात मतदारांना पैसे वाटत असल्याची माहिती शिवसेनेचे कार्यकर्ते पवन सोनवणे यांच्यासह इतरांना मिळाली होती. सोनवणे यांनी अत्तरदे यांच्या समर्थकांना अडवत. त्यांच्या वाहनात बंद पाकिटात असलेली रोकड ताब्यात घेतली आहे.
त्याचबरोबर पैशांची पाकिटे घेऊन फिरणाऱ्या दोघांना देखील ताब्यात घेण्यात आलं. रंगेहात पकडल्यावर सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची पोलखोल केल्यानंतर त्यांनी आपण पैसे वाटत असल्याची कबुली दिली आहे. या कार्यकर्त्यांकडू पोलिसांनी २१ हजारांची रोकड जप्त करून ती रक्कम भरारी पथकाकडे सुपूर्द केली आहे.
दरम्यान, मतदाराच्या चिठ्ठ्या पाहण्यासाठी गेलेल्या आपल्या समर्थकांना दादागिरी करून सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे रोकड असल्याचे जबरदस्तीने वदवून घेतले आहे. पैसे वाटण्याचा काहीही प्रकार घडला नसल्याचे चंद्रशेखर अत्तरदे यांनी सांगितले.