पुणे – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत या दृष्टीने स्वीप अंतर्गत मतदान जागृती उपक्रमांवर भर द्यावा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार यांनी पुणे विभागातील निवडणूक विभागांना दिले.
मतदारांना मतदान केंद्रावर किमान आश्वासित सुविधा योग्यरित्या पुरविल्या जातील, यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पुणे येथे आयोजित विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस निवडणूक आयोगाचे उप निवडणूक उपायुक्त संजय कुमार, प्रधान सचिव अविनाश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, निवडणूक आयोगाचे उपसचिव सुमनकुमार, अवर सचिव अनिलकुमार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.
शहरी भागात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे सांगून हिरदेश कुमार म्हणाले की, मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती व्हावी यासाठी सर्व साधनांचा अवलंब करावा. मतदार चिठ्ठ्यांचे 100 टक्के आणि वेळेत वाटप करावे. पुणे जिल्ह्यात आपले मतदान केंद्र जाणून घ्या- नो युवर पोलींग स्टेशन उपक्रम चांगल्या प्रकारे राबविला जात असून त्याप्रमाणे विभागातील इतर जिल्ह्यातही राबविला जावा.
मतदारांना मोबाइल ॲपद्वारे मतदान केंद्रांची माहिती कशा प्रकारे पहावी याबाबत प्रचार प्रसिद्धी करावी. विभागातील सर्व निवडणूक निरीक्षकांनी नेमून दिलेल्या मतदार संघात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही हिरदेश कुमार यांनी दिल्या.
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना…
– सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, विद्युत पुरवठा, सावली, व्हीलचेअर.
– जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राहील याची दक्षता घ्यावी.
– निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने वाहनांची कसून तपासणी करावी.
– मद्य, अंमली पदार्थ, रोकड, मौल्यवान वस्तू आदींच्या वाहतुकीवर नजर ठेवावी.