सातारा – पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत काल (दि. 1) मतदान शांततेत झाले. आता मतदारांचे लक्ष उद्या, दि. 3 रोजी पुणे येथे होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. निकालाच्या उत्सुकतेपोटी भाजप व महाविकास आघाडीचे उत्साही कार्यकर्ते पुण्यात पोहोचले आहेत. दोन्ही बाजूंचे नेतेही उद्या (गुरुवार) पुण्यात डेरेदाखल होणार आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये विजयाचा गुलाल कोणाच्या अंगावर पडणार याची उत्सुकता आहे.
शिक्षक मतदारसंघात 35 उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे. विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, सत्ताधारी महाविकास आघाडीचे प्रा. जयंत आसगावकर आणि भाजपपुरस्कृत शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्यात चुरशीचा मुकाबला आहे. या मतदारसंघात रयत शिक्षण संस्था आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यामध्ये काम करणाऱ्या शिक्षक मतदारांची संख्या मोठी आहे. या मतदारांचा कौल कुणाला असेल, हे मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.
हा मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला आल्याने कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांचे निकटवर्तीय प्रा. जयंत आसगावकर यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दत्तात्रय सावंत यांनीही प्रचार यंत्रणा गतिमान केली होती. राजकीय नेत्यांपेक्षा सामान्य शिक्षकांवर त्यांची अधिक मदार होती. शेवटच्या टप्प्यात सावंत विरुद्ध आसगावकर असाच मुकाबला रंगल्याचे बोलले जात होते.
पदवीधर मतदारसंघात तब्बल 62 उमेदवार असले तरी खरी लढत भाजपचे संग्रामसिंह देशमुख व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड यांच्यात आहे. देशमुख हे सांगली जिल्ह्यातील असून भाजपला खिंडीत गाठण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी लाड यांच्या मागे मोठी ताकद उभी केली. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळणार का, याचे उत्तर उद्या मिळणार आहे. जेडीएसचे उमेदवार शरद पाटील हेसुद्धा सांगलीतील असल्याने हा सामना बहुरंगी झाल्याची चर्चा आहे. मनसेच्या रूपाली ठोंबरे यांच्या उमेदवारीचीही चर्चा होती.