‘स्वीप’ उपक्रम : चिंचवड येथे जनजागृती अभियान
पिंपरी – सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावत 21 ऑक्टोबरला मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले. चिंचवड येथे यशस्वी एज्युकेशन सोसायटी व पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, चिंचवड विधानसभा मतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती अभियानात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रफुल्ल पुराणिक यांनी सांगितले की, मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक आहे. यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने स्वीप कार्यक्रम राबविला जात असून व्हीव्हीपॅट मशीनच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच निवडणूक आयोगाने तयार केलेले माहितीपट दाखविण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाला संस्थचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, यशस्वी ऍकेडमी फॉर स्किल्सच्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ.सुनिता पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ओंकार वाघ या विद्यार्थ्याने मतदानाच्या शपथेचे वाचन केले. तर, मतदान जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले पोस्टर (फलक) धरून घोषणा देण्यात आल्या. यावेळी पवन शर्मा, संदीप गेजगे, योगेश निकम, अभिजीत चव्हाण, राजेंद्र शेळके, प्रा.महेश महांकाळ डॉ. पुष्पराज वाघ, अदिती चिपळूणकर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.