नवी दिल्ली- करोनातून लवकर सुटका व्हावी यासाठी अनेक देशांत लसीच्या चाचण्या सुरू आहेत. ब्राझील या देशातही करोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्या देशातही लसीच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र या चाचणीत सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाचा तेथे अचानक मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
लसीच्या चाचण्यांच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की ऑक्स्फर्ड ऍस्ट्राजेनेकाकडून तयार केल्या जाणाऱ्या लसीची चाचणी सुरू आहे. यात काही स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान, एका जणाचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी चाचण्या सुरूच राहणार असून त्या थांबवल्या जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित स्वयंसेवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्याकरता गोपनीयतेच्या नियमाचा आधार घेण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली आहे. त्यानुसार स्वयंसेवकाला करोनाची लस दिली गेली नव्हती व करोनामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तो स्वत:च एक डॉक्टर होता व रियो डि जेनेरियो येथे तो करोनाच्या रूग्णांवर उपचार करत होता, असेही संबंधित बातमीत म्हटले आहे.
दरम्यान, ऍस्ट्राजेनेकाच्या प्रवक्त्यानेही स्वयंसेवकाच्या मृत्यूच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र सध्यातरी लसीची चाचणी थांबवण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला गेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.