सातारा -करोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यसेवेसाठी स्वयंसेवकांनी स्वत:हून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकजण पुढे येत आहेत, ही बाब मनाला उभारी देणारी आहे, असे मत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी व्यक्त केले.
करोना बाधितांची वाढणारी रुग्ण संख्या, नागरिकांचा आढावा घेणे, मार्गदर्शन करणे तसेच रिपोर्टिंग करणे अशा प्रचंड कामामुळे व्यवस्थेवर ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःहून विनामोबदला आरोग्यसेवेसाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. कौशल्य, आवड आणि शिक्षण या गोष्टींचा एकत्र विचार करून काम सोपवले जात आहे. जास्तीतजास्त स्वयंसेवकांनी सहभाग घ्यावा आणि जिल्हा परिषदेत संपर्क साधावा असे आवाहन देखील डॉ. पाटील यांनी केले आहे .
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे काम सुरू असून सर्व प्रकारचे मार्गदर्शन, समुपदेशन केले जात असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. प्रबोधन आणि नागरिकांचे शिक्षण व्हावे या हेतूने विविध प्रकारच्या माहिती पुस्तिका, माहितीपत्रके छापली जात असून जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहेत. नागरिकांनी वारंवार हात धुणे, खोकताना शिंकताना काळजी घेणे, शारीरिक अंतर ठेवणे, वारंवार चेहऱ्याला स्पर्श न करणे, हस्तांदोलन न करणे, पूर्णवेळ घरात थांबावे, असे आवाहन डॉ. सचिन पाटील यांनी केले आहे.