विद्यापिठातील संघाच्या प्रचाराबाबत केली चौकशीची मागणी
मुंबई: भाजपच्या आशिर्वादाने महाराष्ट्रातील विद्यापिठांमध्ये शिक्षण क्षेत्रात संघाने घुसखोरी केली आहे. संघाचे स्वंयसेवक विद्यापिठात निर्धारीत शिक्षण देण्याऐवजी विद्यार्थ्यांना संघाचे स्वयंसेवक होण्यासाठी प्रचार करत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. हा प्रकार गंभीर असून या प्रकरणाची चौकशीची मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
शिक्षण क्षेत्रात संघाच्या घुसघोरीला बाळासाहेब थोरात यांनी भाजपला जबाबदार धरले आहे. भाजप सरकारच्या आशिर्वादानेच शिक्षण क्षेत्रात संघाच्या स्वंयसेवकांनी घुसखोरी केल्याचे ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संघाचे स्वंयसेवक विद्यापिठांमध्ये शिक्षण देण्याऐवजी संघाचा प्रचार व प्रसार करत आहेत. संघाचा स्वंयसेवक होण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करतानाच महाविकास आघाडी सरकार असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यासंदर्भात आपण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे. विद्यापिठात संघाचा प्रचार व प्रसार हा गंभीर प्रकार आहे. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी आपण मागणी केल्याचे थोरात यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.