तालिसाय सिटी : फिलीपाईन्सची राजधानी मनिलाच्या दक्षिणेकडे ताल ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे राख आणि तप्त लाव्हा आजूबाजूच्या परिसरात पसरला आहे. ज्वालामुखीच्या धूराच्या ढगांमुळे आतापर्यंत शेकडो विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत.
या परिसरात ज्वालामुखीचा आणखीन उद्रेक होण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्याच्या पाठोपाठ भूकंपाचे धक्केही या परिसरारमध्ये जाणवले.
त्यामुळे जवळपास 10 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. या भागातील रस्ते, घरे आणि झाडांवर राखेचे थर साचले आहेत. ज्वालामुखीमधून बाहेर पडणरी राख आकाशामध्ये काही किलोमीटर पर्यंत उंच उडत असल्याचे दृश्य लांबूनही दिसते आहे.
या भागातील भूकंपांच्या धक्क्यांमुळे त्सुनामी लाटा उसळण्याचा इशाराही दिला गेला आहे. ज्वालामुखीचा लाव्हा पसरलेल्या भागातील वनसंपदा जळून खाक होऊ लागली आहे.
ज्वालामुखीमुळे मनिला आणि ताल परिसरातील शाळा, सरकारी कार्यालये आणि शेअर बाजारही सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे.
मनिलाच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दुपारनंतर मर्यादित विमानसेवा पुन्हा सुरू झाली.
मात्र रविवारपासून 240 विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली होती. ताल ज्वालामुखीचा उद्रेक एका तलावाच्या परिसरामध्ये झाला आहे. या देशातील हा सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. फिलीपाईन्समध्ये भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक हा जीवनाचा एक विध्वंसक भाग बनला आहे.