जकार्ता – इंडोनेशियातील माऊंट सेमेरू या ज्वालामुखीचा आज उद्रेक झाला. त्यामुळे आजूबाजूच्या दाट लोकवस्तीच्या भागावर लाव्हा आणि राख पसरायला सुरुवात झाली आहे. ज्वालामुखीमुळे अवकाशात ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या वायूंचे ढग दाटून राहिले आहेत.
पावसाळ्यातील मुसळधार पावसामुळे या ज्वालामुखीच्या तोंडावरील जमिनीचा ऱ्हास झाल्यामुळे 3,676 मीटर उंचीवरील या पर्वतावरील हा ज्वालामुखी पुन्हा आग ओकू लागला आहे, असे नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट एजन्सीच्या प्रवक्त्यांनी उर्जा मंत्रालयांतर्गत असलेल्या “व्होलकॅनोलॉजी ऍन्ड जिओलॉजीकल हजार्ड मिटीगेशन एजन्सी’च्या हवाल्याने सांगितले.
ज्वालामुखीूची राख तब्बल 1,500 मीटर उंचीपर्यंत फेकली जाते आहे. तर तप्त लाव्हा सेमेरू पर्वतावरून ओघळू लागला आहे. हवेत पेकली गेलेली राख अनेक गावांवर पडायला लागली आहे. आसमंतात धुराचे ढग साचल्यामुळे सूर्यप्रकाश देखील रोखला जाऊ लागला आहे. या ज्वालामुखीमुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
आजूबाजूच्या गावांमधील लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. ज्वालामुखीच्या मुखापासून 5 किलोमीटरपर्यंत कोणीही फिरकू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. सेकडो नागरिकांनी दूरवरच्या सुरक्षित ठिकाणी तात्पुरता मुक्काम हलवला आहे.
माऊंट सेमेरू हा ज्वालामुखीचा यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उद्रेक झाला होता. तेंव्हा जवळपास 10 हजार गावांना स्थलांतर करावे लागले होते. गेल्या 200 वर्षात अनेक वेळा या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियामध्ये 129 जिवंत ज्वालामुखी आहेत.