नवी दिल्ली- मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश व्ही.के.ताहिलरमानी यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला आहे. न्या. ताहिलरमानी यांनी 6 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याच दिवसापासून हा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे, असे सरकारी अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.
न्या. ताहिलरमानी या मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने त्यांची बदली मेघालयात केली. या बदलीच्या निषेधार्थ आणि न्या. ताहिलरमानी यांची बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी मद्रास हायकोर्टातील वकिलांनी काम बंद आंदोलनही केले होते. आपल्या बदलीचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी न्या. ताहिलरमानी यांनी कोलेजियमकडे केली होती. ही विनंती फेटाळण्यात आल्यावर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी अन्य न्यायाधीशांची नियुक्ती होईपर्यंत न्या. व्ही. कोठारी यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.