कोची : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, विचारवंत, सर्जनशील लेखक आणि विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी. परमेश्वरन यांचे आज केरळमधील ओट्टाप्पालम येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. ओट्टापलम जिल्ह्यातील आयुर्वेदीक उपचार केंद्रामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
पूर्वीच्या भारतीय जनसंघाचे नेते असलेल्या परमेश्वरन यांनी दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर सुरुवातीच्या काळात काम केले होते. केरळमध्ये राष्ट्रीय विचारांची जोपासना करण्यासाठी परमेश्वरन यांनी भारीय विचार केंद्रमची स्थापना केली होती.
पी. परमेश्वरन यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. परमेश्वर हे एक उत्तम लेखक, कवी आणि शिस्तप्रिय व्यक्ती होते असे उपराष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
तर परमेश्वरन हे भारताचे एक श्रेष्ठ पुत्र होते, त्यांनी त्याचे जीवन भारतीय संस्कृती विषयीच्या जनजागृतीसाठी, अध्यात्मिक प्रगती, आणि गरीबांच्या सेवेसाठी समर्पित केले होते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.परमेश्वरन यांच्या कार्याचा गौरव म्हणून 2018 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.