जग कुठल्या कुठे गेले…आपल्याकडे मात्र अजुनही…

नवी दिल्ली- आजच्या भारतबंदच्या पार्श्‍वभूमीवर चित्रपट निर्माता-लेखक आणि कार्यकर्ता विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्‌वीट केले आहे. जग आज कुठल्या कुठे पोहोचले आहे. मात्र आपल्याकडे अजुनही रेल रोको आणि दगडफेकच सुरू आहे असे त्यात त्यांनी म्हटले आहे.

आजच्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारला असून अनेक राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबाही दर्शवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अग्निहोत्री यांनी केलेले ट्‌वीट चर्चेचा विषय ठरले असून त्याला जोरदार प्रत्युत्तरही दिले गेले आहे.

जग कुठल्या कुठे पोहोचले असले तरी आपल्याकडे अजुन बंद, रेल रोको, विकास रोको, दगडफेक अशी कोल्ड वॉरच्या काळातील अर्थात शीतयुध्दाच्या काळातील राजकीय शस्त्रांचा वापर केला जातो आहे.

आपण काय करतोय याची त्यांना कल्पना नाही अशातला भाग नाही. ते जाणीवपूर्वक असे करत आहेत. देश प्रगती करण्याचा व पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ही मंडळी आपल्या मागासलेपणाने ते मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा एक समजून ठरवलेल्या रणनीतीचा भाग आहे. प्रगती आणि सुधारणा रोखणे हाच एकमात्र उद्देश त्यामागे आहे. त्याकरता जनहित याचिका, माध्यमांतून खोटे लेख, युवकांना आणि अशिक्षितांना भडकावणे, रस्त्यांवर धरणे धरणे, गोंधळ घालणे, अराजक माजवणे हे प्रकार केले जात आहेत. सरकारला आपली सगळी शक्ती हे प्रकार रोखण्यात खर्च करायला लावली की  देश आपोआप मागे पडतो असे अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.

अग्निहोत्री पुढे म्हणतात वर्षातील 365 पैकी किमान 250 दिवस देशातल्या कोणत्या तरी भागात कोणत्या तरी विषयावरून आंदोलने सुरूच असतात. देश त्यातच गुंतून राहतो. या प्रकारांमुळे कार्यक्षमता आणि निर्मितीक्षमता किंवा उत्पादन क्षमता यावर काय प्रभाव पडतो याबाबत कोणीही बुध्दीजीवी काहीच बोलत नाही. मात्र यातून जेव्हा देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होते तेव्हा टीका करण्यासाठी हीच मंडळी सगळ्यांत आघाडीवर असतात.

प्रत्येकाने आज स्वत:ला एक प्रश्‍न विचारण्याची आवश्‍यकता आहे. आज देशाला या कठीण काळात काय हवे आहे? प्रगती की बंद असा सवाल करतानाच डिजिटलच्या या काळात रस्ते रोखून धरणे हाच एक असंतोष प्रकट करण्याचा मार्ग आहे का? एखादी डिजिटल मोहीम उभारा. दहा वीस कोटी लोकांच्या डिजिटल स्वाक्षरी मिळवा आणि आपला विरोध प्रकट करा. का नाही करत असे, असा सवाल उपस्थित करताना किमान तसे प्रयत्न तर करा असे त्यांनी म्हटले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.