पंढरपूर – गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आज सर्वत्र गुढीपाडचे मंगलमय वातावरण दिसून येत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. याच दिवसाचे औचित्य साधून आज संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट केली आहे. शेवंती, झेंडू, अश्टरच्या, जरबेरा, कामिनी व गुलाब फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक आरास केल्याचं दिसून येत आहे.
पुणे येथील विठ्ठल भक्त नाना आणि नवनाथ मोरे यांच्याकडून ही मंदिर सजावट करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे. पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे.