पंढरपूर – देशभरामध्ये आज 74 प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे सध्या देशात आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली असून विठुराया तिरंगी रंगात न्हाऊन निघाला आहे.
आज नेमकी वसंतपंचमी असून तिथीनुसार विठ्ठल रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाहसोहळा संपन्न होत आहे. त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणी चौखांबी, सोलखंबीला तिरंगी फुलांची अतिशय आकर्षक सजावट केली आहे.
दरम्यान, पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही तिरंगी फूल सजावटीची सेवा अर्पण केली आहे. यावेळी श्री विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आणि सभामंडप, तसेच मंदिरात फुलापासून सुंदर व आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे.
यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर देखील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील फोटो व्हायरल होत असून, सर्वच जण यावर कमेंट आणि लाईक्स करत आहेत.